- आयोगाने मतदारयादीसाठी जाहीर केला कार्यक्रम
Image Source:(Internet)
नागपूर :
जिल्हा परिषद निवडणुकीची (Zilla Parishad elections) प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार असून राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी अंतिम करण्याचे आदेश देत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने निवडणुकीत रंगत वाढणार आहे. जिल्हा परिषदेची मुदत १७ जानेवारीला संपल्यानंतर तात्काळ निवडणूक अपेक्षित होती. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आणि प्रशासक राज सुरू झालं. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
सध्या मतदारयादी आणि आरक्षणावर चर्चा सुरू आहे. चक्राकार आरक्षणाबाबत काहींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे.
आयोगाचा कार्यक्रम-
राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
७ ऑक्टोबरला प्राथमिक यादी प्रसिद्ध होईल.
८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील.
२७ ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे.
यादीत असलेल्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, हे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर निवडणुकीची औपचारिक घोषणा होईल.
मतदारसंख्या व सर्कल-
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदारयादीचा आधार घेतला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण १४ लाख ९७ हजार ४७८ मतदार नोंदले गेले आहेत. जिल्हा परिषदेत ५७ सर्कल असून त्याखाली ११४ पंचायत समितीचे गण आहेत.