मराठवाड्यात मुसळधार पावसाचा तडाखा; चार बळी, लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली!

    23-Sep-2025
Total Views |
 
Marathwada rain
 Image Source:(Internet)
छत्रपती संभाजी नगर :
मराठवाड्यात (Marathwada) गेल्या चोवीस तासांत मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले. पूरस्थितीत चार जणांचा मृत्यू झाला असून ७६ जनावरे दगावली आहेत. तब्बल १८ लाख हेक्टरांहून अधिक क्षेत्रातील पिके जलमय झाली आहेत. धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
 
धाराशिव जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २०० नागरिकांना एनडीआरएफ व लष्कराच्या पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. भूम तालुक्यातील चिंचोगील येथे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये वीज पडून एकाचा, तर लातूरमध्ये महिलेचा मृत्यू झाला. काटेजवळगा येथे दयानंद बोयणे हे पाण्यात वाहून गेले.
 
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात आठ तासांत १५० मिमी पाऊस पडला. वरखेडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ३५ वर्षीय शेतकरी सतीश चौधरी यांचा मृत्यू झाला. परांडा तालुक्यातील घाटपिंपरी, वडनेर आणि वागेगव्हाण येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देवगावमधून हेलिकॉप्टरद्वारे २८ जणांची सुटका करण्यात आली.
 
लातूर जिल्ह्यात सांगवी येथील अनिता राठोड (३८) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. जिल्ह्यातील वीसहून अधिक रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. याआधीच १२ लाख हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले होते; नव्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संकट अधिक गडद झाले आहे.