शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा; अतिवृष्टीग्रस्तांना 3,554 कोटी रुपयांची मदत जाहीर

    23-Sep-2025
Total Views |
 
Maha gov Farmers Nagpur
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये सुमारे 70 लाख एकर पीक संपुष्टात आले असून अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची घोषणा केली आहे.
 
मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णयानुसार 2,215 कोटी रुपयांची थेट मदत 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात नुकसान सर्वाधिक झाले असून, नांदेड, बीड, धाराशिव यांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे. काही भागांमध्ये अजूनही पाणी साचल्यामुळे पंचनामे प्रलंबित आहेत; पाणी ओसरल्यानंतर तातडीने मदत वितरणाची कामे पूर्ण केली जातील.
 
याशिवाय, जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी 1,339 कोटी रुपयांची स्वतंत्र मदत जाहीर करण्यात आली आहे. पंचनाम्यांच्या आधारे ही रक्कम मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरीत केली जाईल.
 
बीड आणि धाराशिवसह अनेक भागांमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम असून, सरकारकडून बचावकार्य सुरु आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त गावांतील नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीवर लक्ष ठेवत बचाव कार्याला गती दिल्याचे सांगितले आहे.
 
या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांचा मोठा दिलासा होईल.