यंदा शाळांना दिवाळीची १२ दिवस सुट्टी; अंतिम परीक्षा ८ ते २५ एप्रिलदरम्यान होणार

    22-Sep-2025
Total Views |
 
Diwali holiday
Image Source:(Internet)
सोलापूर :
शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची (Holiday) यादी जाहीर केली असून, शाळांना यंदा एकूण १२९ दिवस सुट्या मिळणार आहेत. यात ५३ रविवार व ७६ सार्वजनिक सुट्ट्या (सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती) समाविष्ट आहेत.
 
दिवाळीची १२ दिवस सुट्टी
या वर्षी शाळांना १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व शाळांची प्रथम सत्र (सहामाही) परीक्षा पार पडेल. यानंतर २८ ऑक्टोबरपासून शाळा पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
 
उन्हाळा सुट्टी ४४ दिवसांची
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं आदेश दिल्यानुसार, अंतिम सत्र परीक्षा व पॅट चाचणी ८ ते २५ एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे. त्यामुळे २ मेपासून १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी मिळेल. यामुळे एकूण ४४ दिवसांची मोठी सुट्टी विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
 
शाळांमध्ये जोरदार तयारी
दिवाळीपूर्वी होणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने शाळांमध्ये सराव परीक्षांना सुरूवात झाली आहे. शिक्षकांकडून प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदा पहिली ते नववीच्या अंतिम परीक्षेसह राज्यस्तरीय ‘पॅट’ चाचणीसाठीही विद्यार्थ्यांना तयारी करता यावी, यासाठी प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या ठेवण्यात येणार आहेत.
 
ठळक मुद्दे
चालू शैक्षणिक वर्षात एकूण १२९ दिवस सुट्या
१२ दिवस दिवाळी सुट्टी : १६ ते २७ ऑक्टोबर
उन्हाळा सुट्टी ४४ दिवसांची : २ मे ते १४ जून
अंतिम परीक्षा : ८ ते २५ एप्रिल
 
दिवाळीपूर्वी होणार सहामाही परीक्षा
यंदाचे वेळापत्रक लक्षात घेता, सुट्ट्यांचा आनंद घेता घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीकडेही लक्ष द्यावे, असे शिक्षकांचे आवाहन आहे.