घरबसल्या रेशन कार्ड अपडेट्स; स्वस्त धान्य दुकानात पारदर्शकतेसाठी लावले चार QR कोड

    20-Sep-2025
Total Views |
 
Ration card updates
 Image Source;(Internet)
नागपूर :
महाराजस्व अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवडीत पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी मोठा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये शिधापत्रिकेतील (Ration card) नाव वाढवणे किंवा कमी करणे यासह रेशन संबंधित कामे घरबसल्या करता येणार आहेत. तसेच, ग्राहकाला स्वस्त धान्य मिळते का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का याची माहिती QR कोडच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवता येणार आहे.
 
यासाठी सर्व रेशन दुकानात चार प्रकारचे QR कोड लावले जाणार आहेत:
1. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली
या QR कोडद्वारे नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत नाव वाढवणे किंवा कमी करणे यासाठी घरबसल्या अर्ज करता येईल.
 
2. रेशन दुकानातील धान्य वितरण माहिती
हा कोड स्कॅन करून हक्काचे धान्य मिळत आहे का, वितरणाची तारीख, प्रमाण आणि पात्रता तपासता येईल. तसेच दुकानातून वितरित झालेली सर्व माहिती शासनापर्यंत पोहोचेल.
 
3. रेशन दुकानाला रेटिंग देण्याची प्रणाली
दुकानात ग्राहकाला कशी वागणूक मिळाली, किती सकारात्मकता होती, अतिरिक्त पैसे घेतले गेले का आदी बाबी नोंदवता येतील. तसेच, तक्रारी नोंदवल्यावर वरिष्ठांकडून झालेली कार्यवाही ही माहिती मिळेल.
 
4. कार्यालय सेवा अभिप्राय फॉर्म
रशन दुकानातील सेवेशी संबंधित अभिप्राय देणे शक्य होईल. यामुळे शासनाला नेमकी माहिती मिळेल आणि भविष्यात व्यवस्थेत आवश्यक बदल करता येतील.
 
जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने या सेवा पंधरवडीत शिधापत्रिकांवरील कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्य विभक्त झाल्यास स्वतंत्र शिधापत्रिका बनवणे, विवाह किंवा स्थलांतरामुळे नाव वगळणे, नव्याने समावेश करणे ही कामे प्राधान्याने केली जात आहेत.
 
या उपक्रमामुळे ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक पुरवठा व्यवस्था राज्यात अंमलात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.