मुंबईत मराठा आंदोलनावर पोलिसांची कडक कारवाई; CSMT स्थानकातून आंदोलकांना हटवलं

    02-Sep-2025
Total Views |
 
Police take strict action
 (Image Source-Internet)
मुंबई :
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं मराठा (Maratha) आरक्षण आंदोलन आता टोकाला पोहोचलं आहे. राज्य सरकार आंदोलन आवरण्यासाठी सक्रिय झालं असून, मुंबई पोलिसांनीही निर्णायक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना आधी हटवण्यात आलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू आहे.
 
कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांचा वेगवान निर्णय-
मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी बजावली होती. ती नोटीस थेट त्यांच्या हाती देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मैदानावर गेले. त्यानंतर न्यायालयाच्या सूचनांनुसार पोलिसांनी हालचाली अधिक वेगवान केल्या. स्थानकांवर जमलेल्या आंदोलकांना "बाहेर पडा" अशा कडक सूचना देण्यात आल्या असून, सार्वजनिक जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत.
 
आंदोलकांचा ठाम पवित्रा-
मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे पाटील यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही रस्त्यांवरील अडथळे दूर केले आहेत, मात्र आझाद मैदान कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. पोलिसांनी दिलेल्या नोटीसीला आमचे वकील कायदेशीर उत्तर देतील. मनोज दादांना आंदोलन थांबवायला कोणी भाग पाडू शकत नाही.”
 
त्यांनी सांगितलं की, जरांगेंच्या आवाहनानंतर गाड्या व लोकांना मैदानाबाहेर हलवण्यात आलं आहे, तरीही मुख्य आंदोलन आझाद मैदानातच सुरू राहील.
 
न्यायालयीन सुनावणीवर राज्याचे लक्ष-
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन झालं की नाही, याची तपासणी आज होणार आहे. त्यामुळे न्यायालयाकडून नव्या सूचनांची अपेक्षा राज्यभरात निर्माण झाली आहे.