'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तोयबाचा कबुलीजबाब; पाकिस्तानचे खोटे दावे झाले उघडे!

    19-Sep-2025
Total Views |
 
Lashkar e Taiba
 Image Source;(Internet)
नवी दिल्ली :
७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) कारवाईनंतर पाकिस्तान सरकारने जगाला गाफील ठेवण्यासाठी खोटे दावे केले होते. मात्र, आता स्वतः दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या (LET) कमांडरांनी या हल्ल्याची कबुली देत पाकिस्तानचा मुखवटा फाडला आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लष्करचा कमांडर कासिम मुरीदके येथील मरकझ तैयबा मुख्यालय भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्याचे कबूल करताना दिसतो. तो म्हणतो, "मी मरकझ तैयबाच्या अवशेषांवर उभा आहे. ही मशीद पूर्वीपेक्षा मोठी उभी राहील." त्याने मान्य केले की या तळावर मोठ्या प्रमाणात मुजाहिदीन व विद्यार्थ्यांना जिहादी प्रशिक्षण दिले जात होते.
 
दरम्यान, पाकिस्तान सरकारने मात्र जगासमोर असा दावा केला होता की ही इमारत दहशतवादी वापरत नाहीत. पण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लष्करचा कार्यकर्ता पाकिस्तानी तरुणांना 'दौरा-ए-सुफ्फा' या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करत असल्याचे स्पष्ट दिसते.
 
ऑपरेशन सिंदूरची व्याप्ती:
मुरीदकेतील लष्कर-ए-तोयबाचा तळ उद्ध्वस्त
बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ हल्ल्यात धुळीस मिळाले
सियालकोटमधील हिजबुल मुजाहिदीनचा तळ नष्ट
बर्नाला व मुझफ्फराबादमधील लष्करचे तळ उद्ध्वस्त
 ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर करण्यात आली होती.
 
याच वेळी, लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी यानेही एका व्हिडिओमध्ये पाकिस्तान सरकारकडून थेट निधी मिळत असल्याचे उघड केले. "मुरीदके मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळाली," असा खुलासा त्याने केला.
 
फक्त लष्करच नव्हे, तर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी यानेही बहावलपूरवरील भारतीय हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे कबूल केले होते. इतकेच नव्हे, तर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशानुसार मृत दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला जनरल्सनी उपस्थिती लावल्याचेही त्याने सांगितले.
 
या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान सरकारचे खोटे दावे पुन्हा एकदा उघडे पडले असून भारतीय सैन्याच्या हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटनांची कंबर मोडली असल्याचे वास्तव आता दहशतवादी स्वतः मान्य करत आहेत.