महाराष्ट्रावर हवामानाचं सावट;पुढील २४ तास चिंताजनक, हवामान विभागाचा इशारा

    18-Sep-2025
Total Views |
 
Weather threat
 Image Source;(Internet)
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर कायम असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र धोक्याच्या वर्तुळात-
मुंबईत आणि परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सांगली परिसरातही पावसाचे ढग गडद झाले आहेत.
 
दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल ७ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, मका, केळी आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना शहरात अतिवृष्टीमुळे अनेक घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा तडाखा-
उमरगा तालुक्यात पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे निचांकी भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे. जालना जिल्ह्यात १९ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट लागू राहणार आहे. अनेक गावांमध्ये अजूनही पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
 
नांदेडमध्ये पूरस्थिती-
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचं पाणी पंचवटी नगर व वसरणी भागात शिरलं असून अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ लोकांची सुटका केली आहे. विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडल्यामुळे नदीला मोठा पूर आला असून सध्या १.६२ लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे.प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि शक्यतो बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.