Image Source;(Internet)
नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (Gavai) यांच्या खजुराहो येथे भगवान विष्णूच्या मूर्तीबाबत केलेल्या विधानावरून गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण झाला होता. समाजमाध्यमांवर त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना स्वतः गवई यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी आयुष्यभर सर्व धर्मांचा आदर केला आहे आणि पुढेही करत राहीन. कोणत्याही धर्माबाबत अनादराची भावना माझ्या मनात नाही.”
त्यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर वातावरण काहीसं शांत झालं असलं तरी वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गवईंच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली. “मी त्यांना दहा वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत. सोशल मीडियावर होत असलेली टीका एकतर्फी व अन्यायकारक आहे. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असते, पण इथे जी प्रतिक्रिया उमटली ती अतिशयोक्तीपूर्ण आहे,” असं मेहता म्हणाले.
दरम्यान, वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाचा संदर्भ घेत समाजमाध्यमांवर टीका केली. ते म्हणाले, “आज सोशल मीडिया हा बेलगाम घोडा झाला आहे आणि त्याचे परिणाम आपण दररोज भोगतो.” या वक्तव्याशी CJI गवई यांनीही सहमती दर्शवली. त्यांनी उदाहरण देताना म्हटलं की, “नेपाळमध्ये घडलेल्या अस्थिरतेच्या घटनांमागे सोशल मीडियावर पसरलेली चुकीची माहितीही कारणीभूत ठरली.”
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या बेजबाबदार वापराबाबत गंभीर चर्चा रंगू लागली आहे. मात्र, CJI गवईंच्या स्पष्टीकरणानंतर वाढलेला वाद काही प्रमाणात शमल्याचं दिसत आहे.