देशभरात महिलांसाठी मोफत तपासणी व उपचार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी अभियान’ला सुरुवात

    17-Sep-2025
Total Views |
-  १ लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन, औषधेही विनामूल्य

Swasth Nari Abhiyan(Image Source-Internet)  
 
धार (म.प्र.) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातील धार येथून ‘स्वस्थ नारी – सशक्त कुटुंब अभियान’ (Swathya Nari, Sashakt Parivar) याचा शुभारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत देशभरात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे भरवली जाणार असून, सर्व तपासण्या आणि औषधे मोफत दिली जाणार आहेत. याचबरोबर पंतप्रधानांनी ८व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचीही सुरुवात केली. हे अभियान १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात राबवले जाईल.

आई निरोगी तर घर निरोगी-
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “धार ही नेहमीच प्रेरणेची भूमी राहिली आहे. या अभियानाचा उद्देश महिलांचे आरोग्य जपणे आणि कुटुंबांना बळकटी देणे आहे. आई निरोगी असेल तर संपूर्ण घर व्यवस्थित चालते. परंतु आई आजारी पडली तर घराची व्यवस्था कोलमडते. म्हणूनच कोणत्याही महिलेला माहितीच्या अभावामुळे गंभीर आजाराला बळी पडावे लागू नये, हेच सरकारचे ध्येय आहे.”
 
मोदींनी पुढे सांगितले की, “मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारखे आजार वेळेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे. या शिबिरांत महिलांची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाईल आणि औषधेही सरकार पुरवणार आहे. देशातील भगिनींच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारचा निधी नेहमी खुला आहे.”
 
आरोग्य शिबिरांमध्ये कोणत्या सेवा?
या अभियानात देशभरात १ लाखांहून अधिक शिबिरे घेण्यात येतील. ही शिबिरे आयुष्मान आरोग्य मंदिर, जिल्हा रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय वैद्यकीय संस्थांत होणार आहेत.
 
महिलांसाठी स्त्रीरोग, बालरोग, नेत्रविकार, ईएनटी, दंतचिकित्सा, त्वचारोग, मानसोपचार आदी उपचार उपलब्ध असतील. तसेच, असंसर्गजन्य आजार, अशक्तपणा, गर्भावस्थेतील काळजी, लसीकरण, पोषण, मासिक पाळी स्वच्छता, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
 
या उपक्रमासाठी मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालये, केंद्र सरकारची संस्थाने आणि काही खाजगी रुग्णालये यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.