(Image Source-Internet)
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना भारताची ओळख जगभर बदलून टाकणारे दूरदर्शी नेते असे संबोधत शिंदे यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.
गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले मोदी यंदा ७५ वर्षांचे झाले. या निमित्ताने शिंदे यांनी ‘X’ वर पोस्ट करून मोदींनी स्वतः लिहिलेल्या देशभक्तिपूर्ण ओळी शेअर केल्या. त्या ओळींमधून मोदींच्या ‘नव्या भारताच्या दृष्टिकोनाचा प्रतिबिंब’ दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं.
शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत मोदींनी दिलेल्या नेतृत्वाचा गौरव करताना सांगितलं की, एकेकाळी विकसनशील देश म्हणून दुर्लक्षित असलेल्या भारताला आज जागतिक स्तरावर आदर मिळतोय. “मोदीजींच्या नेतृत्वामुळे आज भारतीय तिरंगा जगभरात अभिमानाने फडकतोय,” असं शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ७५ वर्षांच्या वयातही मोदी तितक्याच जोमाने आणि निर्धाराने कार्य करत आहेत. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पात प्रत्येक नागरिक हा ‘सहप्रवासी’ आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र या प्रवासात पूर्ण ताकदीने सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदींप्रति आपला अभिमान आणि आदर व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “मोदीजी आमचे नेते आहेत, हे आमचं भाग्य आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्ध भारत घडविण्याची शक्ती लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा.”