कोट्यवधींच्या जाहिरातबाजीऐवजी शेतकऱ्यांना मदत द्या;उद्धव ठाकरेंचा सरकारवर थेट आरोप

    16-Sep-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा वेळी पंचनामे करून उशिरा मदत जाहीर करण्यापेक्षा तातडीची आर्थिक मदत देणे अधिक गरजेचे होते. पण सरकारने ‘देवाभाऊ’ नावाच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळले. हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरला असता तर त्यांना दिलासा मिळाला असता,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
 
ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करतानाही जाहिरात काढली जाते. सर्व वृत्तपत्रांमध्ये एकाच व्यक्तीसाठी कोट्यवधी रुपयांची जाहिरात झळकली. हे पैसे आले कुठून? याचा हिशेब कोण मांडणार? जाहिरात काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पोहोचली असती तर सरकारची खरी जबाबदारी पार पडली असती.”
 
दरम्यान, आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला तरी सामना खेळण्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधला. “देशभक्तीचे डांगोरे पिटणाऱ्या भाजपला मी ‘बोगस जनता पार्टी’ म्हणतो. जय शाहच्या हट्टामुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा लागला. एक सामना खेळलो नसतो तरी देशाची प्रतिमा उंचावली असती. पण सरकारने कठोर भूमिका घेतली नाही,” असे ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर, सरकारच्या जाहिरातखर्चावरून सुरू झालेला वाद आता शेतकरी मदतीच्या प्रश्नाशी जोडला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.