धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक; आरक्षणाच्या वादाला नवे वळण

    16-Sep-2025
Total Views |
 
Dhananjay Munde
 (Image Source-Internet)
मुंबई:
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकालात निघालेला नसतानाच राज्यात आणखी एक वाद उभा राहिला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारी निर्णयानंतर बंजारा समाजाने (Banjara community) आपला समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात करण्याची मागणी पुढे सरकवली आहे. मात्र या मागणीला आदिवासी समाजाने जोरदार विरोध दर्शविला असून सामाजिक संघर्षाचे संकेत दिसू लागले आहेत.
 
बीडमधील सभेत मुंडेंचं विधान-
बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी बंजारांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी, “वंजारा आणि बंजारा हे दोन्ही एकच आहेत” असे वक्तव्य केले. यामुळे बंजारा समाज संतप्त झाला असून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
 
बंजारांचा आक्षेप-
बंजारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “वंजारा आणि बंजारा या दोन भिन्न जमाती आहेत. आमच्या हक्कातील अडीच टक्के आरक्षण आधीच वंजाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे ‘वंजारा-बंजारा एकच’ हा उल्लेख मागे घ्या,” अशी मागणी समाजाच्या नेत्यांनी केली. बीडमध्ये घोषणाबाजी आणि आंदोलने सुरू झाली असून हा विषय अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
 
राजकारणात तापलेलं वातावरण-
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारांनी एसटी आरक्षणासाठी मोर्चे काढत आपली ताकद दाखवली आहे. दुसरीकडे आदिवासी समाजाने याला विरोध दर्शविल्याने बंजारा विरुद्ध आदिवासी असा संघर्ष उभा राहू शकतो. या पार्श्वभूमीवर मुंडेंच्या विधानाने परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.
 
मराठा आरक्षणासोबतच बंजारांचा मुद्दा सरकारपुढे नवा डोकेदुखी ठरला आहे. आता या गुंतागुंतीच्या प्रश्नातून राज्य सरकार कोणता मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.