अभिनेत्री शिल्पा शेट्टींचे पती राज कुंद्रा अडचणीत; ६० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची होणार चौकशी

    16-Sep-2025
Total Views |
 
Shilpa Shetty
 (Image Source-Internet)
मुंबई :
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमवारी तब्बल पाच तास चौकशीला सामोरे जावे लागले. ६०.४८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून तपास यंत्रणेने त्यांना पुन्हा एकदा उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
२०१६ साली ‘बेस्ट डील टीव्ही’ या कंपनीत गुंतवणुकीसाठी दीपक कोठारी यांना राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी प्रोत्साहन दिले होते. जवळपास ७५ कोटींच्या गुंतवणुकीची मागणी करताना परताव्याची हमी देण्यात आली होती. यावर विश्वास ठेवून कोठारी यांनी दोन हप्त्यांत ६०.४८ कोटी रुपये गुंतवले.
 
यानंतर शिल्पा शेट्टी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला, तर कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे उघड झाले. कोठारी यांनी गुंतवलेले पैसे परत मागितले असता सतत टाळाटाळ करण्यात आली आणि परतावा नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
प्राथमिक चौकशीनंतर कुंद्रा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी कुंद्रा यांचे जबाब नोंदवण्यात आले. तपास पथक त्याची पडताळणी करत असून पुढील आठवड्यात त्यांना पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावले जाणार आहेत.