(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांनी आज अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी आपली शपथ संस्कृत भाषेत घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपालाचे पद काही काळ रिक्त होते. त्याची जबाबदारी आता आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आली आहे.
आचार्य देवव्रत हे वैदिक परंपरेचे अभ्यासक, समाजकारणाशी जोडलेले व्यक्तिमत्त्व आणि शिक्षणक्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखले जातात. गुरुकुल कुरुक्षेत्र येथे प्राचार्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले असून त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
२०१५ मध्ये ते हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल झाले होते, तर २०१९ मध्ये त्यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आता गुजरातसोबतच महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणूनही ते कार्यभार सांभाळणार आहेत.