
(Image Source:Internet)
नवी दिल्ली :
देशातील जुनी आणि प्रदणकारी वाहने स्क्रॅप केल्यास सरकारला तब्बल ४० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. यामुळे रोजगार निर्मितीलाही मोठा हातभार लागेल, असा त्यांचा विश्वास आहे.
ऑटोमोबाईल कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत गडकरी म्हणाले की, जर सर्व ९७ लाख अयोग्य वाहने हटवली गेली, तर ७० लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील आणि भारताला जगातील आघाडीचा ऑटोमोबाईल उद्योग होण्यासाठी गती मिळेल.
सध्या देशभरात केवळ तीन लाख वाहने स्क्रॅप झाली आहेत. यात बहुतांश सरकारी गाड्यांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्राने या प्रक्रियेसाठी सुमारे २,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वाहन स्क्रॅपिंग धोरणामुळे स्टील, अॅल्युमिनियमसारख्या धातूंचा पुनर्वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल, तसेच प्रदूषण नियंत्रण, इंधन बचत आणि रस्ते सुरक्षिततेलाही मदत होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
त्यांनी ऑटो कंपन्यांना सल्ला दिला की, स्क्रॅप सर्टिफिकेट सादर करणाऱ्या ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर किमान पाच टक्के सूट द्यावी. यामुळे मागणी वाढून उद्योग अधिक मजबूत बनेल, असे ते म्हणाले.