(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात मराठा आरक्षणाचा (Reservation) प्रश्न पुन्हा पेटला आहे. हैदराबाद गॅझेटसंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी आणि मराठा समाजात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला थेट प्रश्न उपस्थित केला, तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर कठोर प्रत्युत्तर दिलं.
भुजबळांचा सवाल-
छगन भुजबळ म्हणाले, “तुम्हाला दिलेलं स्वतंत्र १० टक्के आरक्षण नको आहे का? ते रद्द करायचं का? आणि जर ते रद्द झालं, तर ईडब्ल्यूएसमधलं आरक्षणही नको का?”
तसंच त्यांनी मराठा समाजातील नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार-आमदार यांचा उल्लेख करत, “ते शिकलेले आहेत, जाणकार आहेत, त्यांच्याकडून उत्तर हवं. पण ज्यांना माहिती नाही, अशिक्षित आहेत त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही,” असं वक्तव्य केलं.
जरांगेंचं प्रत्युत्तर-
यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना थेट आव्हान दिलं. ते म्हणाले, “मी शिक्षित असो वा अशिक्षित, पण तुम्हाला रडकुंडीला आणलं ना! तुमचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा होता, पण तो फोल ठरला. आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं.”
सरकारची भूमिका-
या वादाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सरकारने काढलेला जीआर हा पूर्णपणे कायदेशीर चौकटीत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही.