ओबीसींचा सरकारला इशारा; दसऱ्यानंतर मुंबईत भव्य महामोर्चाची तयारी

    11-Sep-2025
Total Views |
 
OBCs warn govt
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता ओबीसी (OBC) समाजही आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, अशी तीव्र नाराजी ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य **महामोर्चा** काढण्याचा निर्णय झाला आहे.

मराठा आंदोलनानंतर ओबीसींची अस्वस्थता-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश काढला. यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. मात्र, ओबीसी संघटनांचा आरोप आहे की यामुळे त्यांच्या आरक्षणावर प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

भुजबळ यांची भूमिका ठाम-
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, न्यायालयात लढा देण्याचा इशारा दिला आहे. ओबीसींच्या विविध संघटनांनी मिळून दसऱ्यानंतर मुंबईत मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण ऑनलाइन बैठक आज होणार आहे आणि अंतिम तारीख निश्चित केली जाणार आहे.
 
न्यायालयात दोन याचिका दाखल-
राज्य सरकारच्या कुणबी प्रमाणपत्र संबंधी अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि दुसरी वकील विनीत धोत्रे यांच्याकडून. या अधिसूचनेमुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी ओबीसी संघटनांचा दावा आहे की ही अधिसूचना बेकायदेशीर आहे.
 
यामुळे कोर्टाने सुनावणी होईपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबवावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.