(Image Source-Internet)
मुंबई :
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव (Uddhav) ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थवर दाखल झाले होते. जवळपास अडीच तास झालेल्या या भेटीने युतीच्या चर्चांना मोठा वेग दिला होता. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवतीर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते.
हिंदी सक्तीच्या वादातून उद्धव व राज ठाकरे यांची राजकीय जवळीक वाढताना दिसली. हिंदी जीआर मागे घेण्यात आल्यानंतर झालेल्या ‘मराठी विजयी मेळावा’त दोन्ही बंधू तब्बल वीस वर्षांनी एकाच मंचावर उभे ठाकले होते. यावेळी दोघांमधील आपुलकी आणि जिव्हाळा विशेष ठरला. मात्र लगेचच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीविषयी कोणतीही वक्तव्ये न करण्याचा आदेश देत संभ्रमाचे वातावरण निर्माण केले होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन मोठ्या भावाला शुभेच्छा देताच, युतीची चर्चा पुन्हा रंगू लागली. आता पुन्हा एकदा झालेल्या या भेटींमुळे ठाकरे बंधू महापालिकेच्या रणांगणात हातात हात घालून उतरतील का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दसरा मेळाव्याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी, “यंदाचा दसरा मेळावा अविस्मरणीय ठरेल,” असे संकेत दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील का, हे सांगणे माझ्या अधिकारात नाही. हा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत,” असे स्पष्ट केले.