महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय,पात्रांना लवकरच कर्जमाफी; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती

    08-Aug-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 (Image Source-Internet)
छत्रपती संभाजीनगर ;
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्यातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सरकारकडून नेमण्यात आलेली विशेष समिती सध्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करत असून, या सर्वेक्षणाच्या आधारे गरजूंनाच लाभ देण्यात येईल. कोणालाही सरसकट लाभ न देता, खऱ्या अर्थाने ज्यांना मदतीची गरज आहे अशाच शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
 
बावनकुळे यांनी गुंठेवारीतील अडचणींवरही भाष्य करताना सांगितले की, २०११ पूर्वीच्या बांधकामांची यादी तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तुकडेबंदी कायद्यामुळे प्रभावित घरमालकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
महसूल विभागात करण्यात आलेल्या सुधारणा देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केल्या. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी लागणाऱ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली असून, घरबांधणीसाठी लागणाऱ्या मुरमावर रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. सिंधी समाजालाही आवश्यक जागा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीबाबत विचारले असता, बावनकुळे यांनी सांगितले की, एनडीएमधील नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अशा भेटी आवश्यक असतात. यामागे कोणताही वेगळा उद्देश नसून, राजकीय संवादाचा भाग म्हणून या भेटी घेतल्या जातात.