(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ (Aapli Bus) सेवेला नागपूरकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात तब्बल 1.60 लाख प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या यशामुळे नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित होतो.
या सेवेच्या यशामागे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. वातानुकूलित बस, वेळेचे काटेकोर पालन, स्वच्छता आणि डिजिटल सेवा यामुळे ‘आपली बस’ ही शहरवासीयांच्या रोजच्या प्रवासातील अविभाज्य भाग ठरत आहे. डॉ. चौधरी यांनी नागरिकांचे आभार मानताना सांगितले की, “ही फक्त वाहतूक सेवा नाही, तर नागपूरच्या हरित आणि स्मार्ट भविष्याकडे नेणारा मार्ग आहे.”
सध्या नागपूरमध्ये 416 बस रस्त्यावर धावत आहेत, त्यापैकी 240 या इलेक्ट्रिक असून, खापरखेडा, पारडी, बुटीबोरी आदी मार्गांवर नव्याने सुरू झालेल्या ई-बसने हजारो प्रवाशांनी प्रवास केला आहे. वर्षाअखेरीस आणखी 145 ई-बस शहरात दाखल होणार असून, यामुळे डिझेलवर चालणाऱ्या बसांची संख्या आणखी कमी होणार आहे.
शहरात 78 मार्गांची पुनर्रचना करण्यात आली असून, काही नवीन मार्गही सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रिप्स आणि कार्यालयीन वेळांमध्ये खास फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत. ‘एनएमसी चालो अॅप’मुळे पास काढणे आणि मार्ग शोधणे अधिक सुलभ झाले आहे.
तसेच नागपूरच्या तीन प्रमुख मार्गांवर 70 टक्क्यांहून अधिक प्रवासी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. लवकरच हे मार्ग पूर्णतः डिजिटल करण्याचा मनपाचा मानस आहे. यामुळे नागपूर भारताच्या डिजिटल ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही एक नवा आदर्श ठरू शकतो.
‘आपली बस’ ही सेवा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी नाही, तर ती नागपूरच्या प्रगतीच्या दिशेने धावणारी प्रेरणादायी कहाणी ठरते आहे.