लाडकी बहिण योजना अडचणीत; सरकारकडून घरोघरी पडताळणी सुरू

    07-Aug-2025
Total Views |

Ladki Bahin scheme
 (Image Source-Internet)
मुंबई:
महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेभोवती (Ladki Bahin scheme) आता संशयाचे वळसे पडत आहेत. लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देणाऱ्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
जालना जिल्ह्यातील तब्बल 70 हजार महिलांची यादी तयार करण्यात आली असून, अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांच्या घरी जाऊन पात्रता तपासली जाणार आहे. अनेक घरांमध्ये एकाचवेळी अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. अपात्र ठरणाऱ्यांची नावे थेट योजनेतून वगळली जाणार आहेत.
 
या योजनेच्या सुरुवातीस पात्रतेचे निकष नीट न तपासता मंजुरी दिली गेली होती. त्यामुळे अपात्र अर्जदारांना देखील फायदा झाला. धक्कादायक बाब म्हणजे राज्यात 14,000 हून अधिक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना जवळपास 10 महिने 1500 रुपये मिळाले. एकूण 21 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे समोर आलं आहे.
 
तसेच 2,000 पेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झालं आहे. एकूण 1.60 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजलेल्या या योजनेला प्रारंभी प्रचंड जनसमर्थन लाभलं होतं. मात्र, आता या योजनेमुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडत असल्याने काटेकोर पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढण्याची मोहीम राबवली जात आहे. योजनेच्या विश्वासार्हतेसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी ही कारवाई अत्यावश्यक ठरली आहे.