
(Image Source-Internet)
मुंबई :
नांदणी (Nandani) मठातील 'महादेवी' हत्तीणीच्या मुद्द्यावर अखेर सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात आता महादेवीला पुन्हा कोल्हापुरात परत आणण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून, तिच्यासाठी नांदणी मठाजवळच पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या केंद्रासाठी ‘वनतारा’ संस्थेने सहकार्य करण्याचा हात पुढे केला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘वनतारा’ व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्यामध्ये 'वनतारा' सक्रिय सहभाग घेणार असल्याचे ठरले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “महादेवी हत्तीणीला गुजरातमधून परत आणण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. या याचिकेसाठी 'वनतारा'ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन केले होते, महादेवीचा ताबा घेण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, हेही 'वनतारा'ने स्पष्ट केले.”
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात वन विभागाने ओळखून ठेवलेल्या जागेवर महादेवीसाठी योग्य पुनर्वसन केंद्र उभारले जाईल. त्या कामातही 'वनतारा' संस्थेने सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. “स्थानिक धार्मिक भावना आणि परंपरेचा आम्ही पूर्ण सन्मान करतो,” असे मत वनताराच्या प्रतिनिधींनी बैठकीत व्यक्त केले.
दरम्यान, मंत्रालयात यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, महादेवीच्या पुनर्प्रवेशाबाबतची जन भावना लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करेल. यासोबतच, नांदणी मठालाही याचिका दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्य सरकारच्या या याचिकेत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषांनुसार सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात येईल. तसेच महादेवीच्या निगा राखण्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञ पथक नियुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत झाला होता.
या सगळ्या घडामोडींमुळे महादेवी हत्तीणीच्या पुनर्वसनाची प्रक्रिया आता अधिकृत आणि सकारात्मक वळणावर आली आहे. कोल्हापूरकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी ठरत आहे.