उत्तराखंड ढगफुटीचा मोठा फटका; पुण्यातील 19 जण बेपत्ता, शोधमोहीम सुरू

    06-Aug-2025
Total Views |
 
Uttarakhand
 (Image Source-Internet)
देहराडून / पुणे :
उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली गावात काल रात्री जोरदार ढगफुटी झाली असून, या नैसर्गिक संकटाने भीषण हानी घडवली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात गावाला पूरचाफेरा बसला असून अनेकजण बेपत्ता आहेत, तर काहींच्या मृत्यूचीही भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेल्या अनेक पर्यटक या आपत्तीत अडकले असून, त्यामध्ये पुण्यातील 19 जणांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
 
ही मंडळी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील असून, 1990 च्या दहावीच्या बॅचमधील मित्रमंडळ एकत्र येत 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला पर्यटनासाठी गेले होते. त्यांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला होता. काल सकाळपर्यंत काही सदस्यांनी कुटुंबीयांसोबत फोटो आणि स्टेटस शेअर केले होते, मात्र दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीनंतर संपर्क पूर्णतः तुटला. त्यामुळे नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
"आम्ही सुखरूप आहोत" म्हणणाऱ्या फोननंतर थेट शांतता-
समूहातील एका महिलेनं तिच्या मुलाशी संपर्क साधून "सर्वजण सुखरूप आहोत" अशी माहिती दिली होती. पण त्यानंतर संपूर्ण संपर्क तुटल्याने संभ्रम वाढला आहे. प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी शोधकार्य सुरू केले असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही तातडीने लक्ष घालून परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील पर्यटन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.
 
इतर जिल्ह्यांचे पर्यटकही अडकल्याचे वृत्त-
सोलापूर जिल्ह्यातील चार युवकही या आपत्तीत अडकले आहेत. त्यांनी काल सकाळी 11 वाजता शेवटचा फोन गंगोत्रीहून घातला होता. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे अशी अडकलेल्या तरुणांची नावे असून, सोलापूर जिल्हा प्रशासन त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुदैवाने, मृतांमध्ये सोलापूरच्या व्यक्तींचा समावेश नसल्याचे एनडीआरएफने स्पष्ट केले आहे.
 
नांदेडमधून गेलेले 11 पर्यटक मात्र सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. हे पर्यटक उत्तरकाशीतील खराडी गावात असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने थेट प्रवाशांशी संवाद साधत त्यांची सुरक्षितता निश्चित केली आहे.
 
आपत्तीमधून सुटका आणि प्रशासनाची कसोटी-
ढगफुटीमुळे उत्तराखंडमधील अनेक रस्ते, पूल आणि संपर्कमाध्यमे नष्ट झाली आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस, एनडीआरएफ व अन्य बचावदलांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांचा शोध लागेपर्यंत नातेवाईक आणि प्रशासनाची ही धडपड सुरूच राहणार आहे.