(Image Source-Internet)
नागपूर :
भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक आणि हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा हा सण 2025 मध्ये नेमका कोणत्या दिवशी साजरा करायचा, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण यंदा पौर्णिमा तिथीचा कालावधी दोन दिवसांमध्ये विभागलेला आहे. 8 आणि 9 ऑगस्ट. त्यामुळे बहिणी आणि भावांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रक्षाबंधन 2025: खरी तारीख कोणती?
हिंदू पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट दुपारी 1:24 वाजता संपेल. शास्त्रानुसार सणाची गणना उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीनुसार केली जाते. यानुसार रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे.सुट्टीचा दिवस असल्यामुळे, हा सण कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवत साजरा करण्याची एक उत्तम संधी ठरणार आहे.
राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त आणि योग-
राखी बांधण्याची योग्य वेळ निश्चित करणं ही परंपरेची एक महत्त्वाची बाब आहे. यंदा अनेक शुभ मुहूर्त आणि योग रक्षाबंधनाच्या दिवशी उपलब्ध आहेत:
ब्रह्म मुहूर्त: पहाटे 4:22 ते 5:04
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:17 ते 12:53
सर्वार्थ सिद्धी योग: दुपारी 2:23 वाजेपर्यंत
सौभाग्य योग: 10 ऑगस्ट रोजी पहाटे 4:08 ते दुपारी 2:15
हे सर्व योग रक्षाबंधनाच्या दिवशी आपुलकीच्या नात्याला शुभ फलदायी ठरणारे आहेत.
भद्राकाळ आणि राहुकाळ – काय टाळावं?
महत्वाची बाब म्हणजे – यंदा भद्राकाळ नाही, त्यामुळे कोणतीही अडचण न येता, कोणत्याही वेळी राखी बांधता येऊ शकते. तथापि, राहुकाळ सकाळी 9:07 ते 10:47 या वेळेत आहे. या वेळेत कोणतीही शुभ कृती त्यात राखी बांधणंही टाळणं योग्य मानलं जातं.
राखीचा रंग आणि ग्रहांचा प्रभाव-
2025 हे मंगळ ग्रह प्रधान वर्ष असल्यामुळे काही ज्योतिषांच्या मते, लाल रंगाच्या राखीचा वापर टाळावा. त्याऐवजी पिवळा, गुलाबी, केशरी किंवा हिरवा रंग हा सणासाठी अधिक शुभ मानला जातो.
यासोबतच बहिणी भावाच्या कुंडलीतले ग्रह बघून राखीचे धागे आणि रंग निवडल्यास, नातं अधिक दृढ आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरू शकते.
सणाचं महत्त्व आणि नात्याचा उत्सव-
रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर तो भावंडांच्या अतूट नात्याचं उत्सव आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना करते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचा शब्द देतो.
2025 मध्ये, पौर्णिमेची उदय तिथी, शुभ मुहूर्त, भद्राकाळाचा अभाव आणि ग्रहांचे सकारात्मक योग यामुळे 9 ऑगस्ट हा दिवस अतिशय मंगलमय ठरणार आहे.