भाजप प्रवेशाची अफवा; राजेश टोपेंचा ठाम नकार, निष्ठा शरद पवार गटासोबतच!

    05-Aug-2025
Total Views |
 
Rajesh Tope
 (Image Source-Internet)
जालना :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. मात्र, या चर्चांवर खुद्द टोपेंनीच पूर्णविराम देत स्पष्ट केलं आहे की, "मी भाजपमध्ये प्रवेश करत नाही, अशा अफवा पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत."
 
माध्यमांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, "मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्याची भेटही घेतलेली नाही. माझी निष्ठा शरद पवार यांच्याशी आहे आणि ती कायम राहणार आहे."
 
राजेश टोपे हे मराठवाडा भागातील प्रभावशाली नेते असून, पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे स्थानिक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
कोरोना महामारीच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळ सदस्य आणि मंत्री म्हणून काम केलं असून, राज्यातील एक अभ्यासू, अनुभवी आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
 
या चर्चांना त्यांनी सडेतोड उत्तर देत स्पष्ट केलं आहे की, "सत्तेसाठी मी पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. माझं राजकारण मूल्यांवर आधारित आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच माझं भवितव्य आहे."
 
या वक्तव्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लागला असून, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे.