स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; दिवाळीनंतर होणार निवडणुका, आयोगाची माहिती

    05-Aug-2025
Total Views |
 
Local Body Elections
 (Image Source-Internet)
मुंबई:
राज्यातील लाखो मतदार आणि राजकीय पक्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) कार्यक्रम आता जवळ येत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहेत. या महत्त्वाच्या घडामोडीनं राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.
 
निवडणुकांसाठी तयारी सुरू; टप्प्याटप्प्याने मतदान-
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने यंदा व्हिव्हिपॅट मशीनचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मतमोजणी पारंपरिक पद्धतीनेच होईल.
 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निर्णायक ठरला-
या निवडणुकांच्या अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचा अडथळा होता – तो म्हणजे नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार त्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. परिणामी, राज्यातील निवडणुका आता नव्या प्रभाग रचनेनुसार व ओबीसी आरक्षणासह होणार आहेत.
 
मुंबईमध्ये मात्र जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक-
मुंबई महापालिकेच्या बाबतीत एक महत्त्वाचा अपवाद आहे. येथे निवडणुका पुन्हा २२७ एकसदस्यीय प्रभागांवर आधारितच होतील. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे प्रभाग २३६ पर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र, सत्ता बदलानंतर महायुती सरकारने ही संख्या पुन्हा २२७ वर आणली होती. यावरही सर्वोच्च न्यायालयात वाद निर्माण झाला, पण तो आता संपुष्टात आला असून मुंबईमध्ये २२७ प्रभागच कायम राहणार आहेत.
 
चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका कुठे?
राज्य सरकारने 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणीतील महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना लागू केली आहे. याचा अर्थ प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जातील. यामुळे स्थानिक पातळीवर मतदारांचे प्रतिनिधित्व वाढणार असून राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
 
अ वर्गातील महापालिका:
पुणे
नागपूर
ब वर्गातील महापालिका:
ठाणे
नाशिक
पिंपरी-चिंचवड
क वर्गातील महापालिका:
नवी मुंबई
वसई-विरार
कल्याण-डोंबिवली
छत्रपती संभाजीनगर
 
राजकीय हालचालींना वेग-
या निर्णयांनंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुका हे राजकीय पक्षांसाठी केवळ स्थानिक सत्ता नव्हे, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारीही मानली जाते. त्यामुळे उमेदवारांचे मोर्चेबांधणी, सोशल मीडिया हल्लाबोल, गट-तटांचे राजकारण आणि महत्त्वाचे गठबंधन याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.