(Image Source-Internet)
उत्तरकाशी :
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कायम असून त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. मंगळवारी उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यातील धराली गावात आलेल्या ढगफुटीमुळे अक्षरशः काही सेकंदांत गावाचा एक भाग जलमय झाला. बाजारपेठ, हॉटेल्स आणि अनेक घरं जलप्रलयात उद्ध्वस्त झाली आहेत.
ही घटना गंगोत्री धामाच्या मार्गावरील खीर गड नदी परिसरात घडली. ढगफुटीनंतर नदीला अचानक मोठा पूर आला आणि तो थेट धराली गावातील बाजारपेठेत घुसला. पाहता पाहता पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने डझनभर घरं, दुकानं आणि सुमारे २० हॉटेल्स व होमस्टेचे मोठे नुकसान केले. काही नागरिक आणि कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती वर्तवली जात आहे.
या नैसर्गिक आपत्तीनंतर पोलिस, SDRF, सैन्य आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. उत्तराखंड पोलिसांनी नागरिकांना नदीपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. "आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता जपा. मुले आणि गुरांना देखील नदीपासून दूर ठेवा," असा संदेशही त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, जेव्हा पाण्याचा प्रवाह गावात शिरला, तेव्हा लोक भीतीने ओरडू लागले. काहींनी वेळेवर उंच भाग गाठत जीव वाचवला, तर काहींच्या घरांमध्ये पाणी आणि मातीचा ढिगारा घुसला. धराली बाजारपेठ पूर्णपणे नामशेष झाली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण होत आहे. सोशल मीडियावर या विनाशकारी घटनेचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रशासनाकडून हानीची खरी स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.