(Image Source-Internet)
नागपूर :
एम्स नागपूरमध्ये (AIIMS Nagpur) एका २२ वर्षीय इंटर्न डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संकेत पंडितराव दाभाडे (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून, रविवारी रात्री हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेतल्याची माहिती समोर आली.
संकेत दाभाडे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी असून, त्यांनी नुकतीच एमबीबीएस पदवी पूर्ण करून नागपूर एम्समध्ये इंटर्नशिप सुरू केली होती. ते चारक हॉस्टेलच्या खोली क्रमांक ९०९ मध्ये राहत होते.
रविवारी दिवसभर संपर्क न झाल्याने सहकाऱ्यांनी हॉस्टेल वार्डनला याची माहिती दिली. दरवाजा उघडल्यानंतर संकेत यांचा मृतदेह बाथरूमजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. सोनगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. मात्र, त्यांचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मित्रपरिवार व सहकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
संकेत यांचे वडील शिक्षक असून, बहीण ही बीएएमएस डॉक्टर आहे. अत्यंत अभ्यासू, शांत आणि सज्जन स्वभावाचा असल्याचे त्यांच्याविषयी सांगितले जात आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांसह हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मानसिक तणाव, अभ्यासाचा दडपण किंवा वैयक्तिक कारणे यांपैकी कोणत्याही कारणाने ही घटना घडली का, याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.