(Image Source-Internet)
मुंबई :
आगामी १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) राज्य सरकारने शाळांसाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी झेंडावंदनासह देशभक्तिपर कवायती घेणे सर्व शाळांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या कवायती किमान २० मिनिटांच्या असाव्यात आणि त्या प्रभावी पार्श्वसंगीतासह तसेच विषयानुरूप पोशाखात सादर कराव्यात. या उपक्रमात सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग असावा आणि कवायतीतून स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब उमटावे, यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
या निर्णयाची रूपरेषा प्रजासत्ताक दिन २०२५ साठीच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहे. प्रभात फेरी, भाषण, कविता, चित्रकला, नृत्य आणि खेळ यांसोबत यंदा 'कवायती' हा नविन उपक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता असल्यामुळे, सध्याच्या शिक्षकांनाच हे प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे शाळांवर अतिरिक्त ताण येणार असल्याचे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, यंदाचा स्वातंत्र्यदिन गोकुळाष्टमी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, १४ ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये ‘पसायदान’ पठण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संबंधीचे निर्देश शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
या सर्व उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी शाळांनी आवश्यक तयारी करावी आणि प्रत्येक कार्यक्रमाचा अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.