(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच अपेक्षित असून, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांनी ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याने नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील हालचालींना वेग-
राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीत (मविआ) संभाव्य सहभागाबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. नागपूर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी या विषयावर महत्त्वाचे संकेत दिले. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, हे सकारात्मक आणि आनंददायक पाऊल आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे," असे देशमुख यांनी म्हटले.
मुंबई महापालिकेवर नजर-
मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं की, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता येणार, असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील.”
मनसेचा समावेश — निर्णय लवकरच-
राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायचं का, याबाबत विचार सुरू असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल, असंही देशमुख यांनी सूचित केलं. काँग्रेसकडून यावर काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हिंदी-मराठी वादावर ठाम भूमिका-
हिंदी विरुद्ध मराठी भाषेवरून सध्या वाद निर्माण झालेल्या घटनांवरही देशमुखांनी आपली भूमिका मांडली. “महाराष्ट्रात हिंदीला विरोध नाही, पण येथे मराठी बोलता आलीच पाहिजे. जे बोलू शकत नाहीत, त्यांनी हट्ट करू नये. 'मैं मराठी नहीं बोलूंगा' अशा वृत्तीमुळेच वाद निर्माण होतात,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
पुढे काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अशाच प्रकारचे मत व्यक्त करत म्हटलं होतं की, राज्यातील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना स्थानिक पातळीवर कोणाशीही आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मनसेचा मविआत समावेश हा केवळ शक्यतेचा मुद्दा राहिलेला नसून, तो आता प्रत्यक्षात उतरण्याच्या उंबरठ्यावर आहे.
राज्यात सत्ताधारी महायुती विरुद्ध एकत्र येत असलेल्या विरोधकांचा हा नवा डाव, राजकीय समीकरणं कशी बदलतील याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.