कोराडी रोड फ्लायओव्हरवरून उडी घेऊन होमगार्डची आत्महत्या; परिसरात खळबळ

    04-Aug-2025
Total Views |
 
Home guard commits suicide
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या क्रीडा संकुलासमोर सोमवारी दुपारी एक मन हेलावणारी घटना घडली. यशवंत रमेश साहू (वय ३१), असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी कोराडी (Koradi) रोडवरील फ्लायओव्हरवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत साहू हे जरीपटका परिसरातील कुकरेजा नगर येथे राहत होते आणि सध्या होमगार्ड म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाची नोकरीही करत होते. सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या दुचाकीने फ्लायओव्हरवर येऊन ती रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि काही क्षणांनी अचानक खाली उडी मारली.
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, साहू काही वेळ फ्लायओव्हरवर उभे होते आणि अचानक त्यांनी उडी घेतली. जमिनीवर पडताच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ घटनास्थळी पोलीस आणि अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाली. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
सध्या आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. यशवंत साहू यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याचा तपास सुरू असून, कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.
 
दिवसा ढवळ्या, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.