(Image Source-Internet)
मुंबई:
मराठा (Maratha) आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. आंदोलनाचा पहिला दिवस शुक्रवारी पार पडला, पण सुरुवातीलाच आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागला. खाऊगल्ल्या बंद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद, तर सार्वजनिक शौचालयांनाही कुलूपं लावण्यात आली होती. या प्रकारामुळे जरांगे पाटलांनी सायंकाळी संताप व्यक्त करत सरकारवर गंभीर आरोप केले.
‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत,’’ असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यांनी पुढे सांगितलं की, ‘‘लासलगावहून उद्या ट्रकभर भाकरी मुंबईला पोहोचेल.’’ त्यांच्या या वक्तव्याचा तात्काळ परिणाम दिसून आला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु झाला.
सोशल मीडियावर मदतीच्या पोस्ट्सचा पाऊस पडू लागला आहे. कुणी पाच हजार पाण्याच्या बाटल्या दिल्याचं जाहीर केलं, तर कुणी भाकरी-चपात्यांच्या गाड्या भरून पाठवल्या. काही ठिकाणी फळं, खिचडी आणि नाश्त्याची सोय केली गेली आहे. ‘‘मुंबईतल्या आपल्या बांधवांना उपाशी-प्यासा ठेवू नये,’’ या भावनेतून ग्रामीण भागातील मराठा समाज मोठ्या संख्येने धावून येत आहे.
जरांगे पाटलांचे शब्द-
‘‘फडणवीस साहेब, आमच्या गावात तुम्ही आलात तर आम्ही पाणी-भाकर देतो, पण तुम्ही आमच्याच लेकरांना उपाशी ठेवण्याचा डाव रचता आहात. अशा वागणुकीला आम्हीही उत्तर देऊ. आमच्या लोकांना अन्यायाने हालवू नका. आम्ही मेहनती आहोत, माजलेले नाही. आमच्या लेकरांना उपाशी मारू नका,’’ असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं .‘‘मी फक्त रस्ते मोकळे करा असं सांगितलं होतं, पण आमच्याबद्दल खोटे संदेश पसरवले गेले. इथं आलेले सगळे आपलेच आहेत, महाराष्ट्र तुमचाही आहे. त्यामुळे विचार बदला आणि समाजाविरोधात कटकारस्थान करणं थांबवा.या घडामोडींमुळे आंदोलनाला महाराष्ट्रभरातून मिळणारं सामाजिक आणि भावनिक बळ अधिक ठळकपणे दिसून येत आहे.