(Image Source-Internet)
मुंबई:
देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज सकाळी दिलेल्या अंदाजानुसार, २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट-
हवामान खात्याने सांगितले की, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईत सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून, घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना, परभणी, भंडारा, नांदेड, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
इतर राज्यांतही जोरदार पाऊस-
महाराष्ट्रासह छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, गोवा, ओडिशा, आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
नाशिक जिल्ह्यात धरणे ओसंडून वाहणार-
नाशिक जिल्ह्यात पावसाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. गंगापूर धरण तब्बल ९८ टक्के भरले असून उर्वरित १२ धरणे १०० टक्के क्षमतेला पोहोचली आहेत. सध्या गंगापूर धरणातून ३०२५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नाशिकसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
मुसळधार पावसामुळे घाटमाथा आणि मराठवाडा परिसरातील रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रिमझिम पावसाचा फायदा पिकांना होणार असला तरी, अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.