गणेशोत्सव २०२५ : गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व!

    26-Aug-2025
Total Views |
 
Ganeshotsav
 (Image Source-Internet)
मुंबई :
गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हटलं की भक्तांच्या घराघरात उत्साह, आनंद आणि मंगलमय वातावरणाची रेलचेल असते. यंदा श्रीगणेश चतुर्थी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी होणार आहे. पंचांगानुसार, पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ या वेळेत घरगुती गणेशप्रतिष्ठापना करण्यास विशेष शुभ मानले गेले आहे.
 
गौरी-गणपती उत्सवाचे प्रमुख दिवस-
गौरी आवाहन : रविवार, ३१ ऑगस्ट (अनुराधा नक्षत्र) सूर्योदयापासून संध्याकाळी ५:२७ पर्यंत
गौरी पूजन : सोमवार, १ सप्टेंबर
गौरी विसर्जन : मंगळवार, २ सप्टेंबर (मूळ नक्षत्र) सूर्योदयापासून रात्री ९:५१ पर्यंत
अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जन : शनिवार, ६ सप्टेंबर २०२५
श्रद्धेनुसार योग्य मुहूर्तात गणेशप्रतिष्ठापना केली तर घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि सौख्य, समृद्धी लाभते.
 
प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त आणि दिशा-
घरातील ईशान्य कोपरा गणेशस्थापनेसाठी सर्वाधिक पवित्र मानला जातो. प्रतिष्ठापनेच्या आधी देव्हारा स्वच्छ करून पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून मूर्ती स्थापित करावी. दीप-धूप प्रज्वलित करून संकल्प करावा आणि परिवारासह मंत्रोच्चार सुरू करावा.
 
स्थापनेनंतर सकाळ-संध्याकाळ आरती, नैवेद्य व दुर्वा अर्पण करण्याची परंपरा जपावी. दाते यांच्या मते, योग्य मुहूर्त आणि दिशा जुळल्यास कुटुंबातील शुभकार्य सुरळीत पार पडतात.
 
गणेशमूर्ती अंधाऱ्या किंवा अस्वच्छ ठिकाणी न ठेवता प्रकाशमान, हवेशीर स्थळी ठेवावी. प्रतिष्ठापनेपूर्वी मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणेही आवश्यक आहे.
 
गणेश पूजेचा सोपा विधी-
पहाटे स्नान करून देव्हाऱ्याची स्वच्छता करावी.
श्रीगणेशास गंध, अक्षता, शेंदूर, हळद-कुंकू अर्पण करावे.
नैवेद्यासाठी मोदक, पेढे, फळे व पंचामृत दाखवावे.
आरतीत “सुखकर्ता दु:खहर्ता” सहित गणपती अथर्वशीर्ष पठण केल्यास चैतन्य वृद्धिंगत होते.
दुर्वा, बेलपत्री, सुगंधी फुले व अत्तर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पूजेनंतर प्रसाद कुटुंबीयांमध्ये वाटावा.
 
धार्मिक महत्त्व-
शास्त्रानुसार, विघ्नहर्ता श्रीगणेशाची उपासना संकटांपासून संरक्षण करते, घरात सुख-शांती आणते आणि बुद्धी-बल-विवेक वाढवते. कोणत्याही शुभारंभावेळी प्रथम गणेशपूजा केल्यास कार्यसिद्धी सहज होते, असा लोकविश्वास आहे.
 
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक पर्व नसून सामाजिक एकतेचाही संदेश देतो. उत्सवकाळात नित्य आरती, नामस्मरण, दानधर्म आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचे पालन केल्यास श्रद्धेला अधिक चिरस्थायी मूल्य प्राप्त होते.