(Image Source-Internet)
दिल्ली :
रुग्णालय बांधकामातील कथित गैरव्यवहार प्रकरणावरून आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी भारद्वाज यांच्या घरासह एकूण १३ ठिकाणी झडती घेण्यात आली.
माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये दिल्ली सरकारने २४ रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सहा महिन्यांत आयसीयू सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले गेले, मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त अर्धे कामच पूर्ण झाले आहे. प्रकल्पांचा खर्च ४८८ कोटी रुपयांवरून तब्बल १,१३५ कोटी रुपयांपर्यंत गेला असून, ८०० कोटींहून अधिक रकमेचा वापर झाला तरी काम वेळेत संपले नाही.
या गैरव्यवहाराची सुरुवातीची चौकशी भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने (एसीबी) केली होती. एसीबीने जून २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला, तर त्यानंतर जुलैमध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा केस नोंदवला.
ही तक्रार भाजपचे नेते व तत्कालीन विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी केली होती. त्यांनी भारद्वाज आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर सरकारी निधीचा गैरवापर, बजेटमध्ये फेरबदल आणि ठेकेदारांशी संगनमताचा आरोप केला होता.
ईडीच्या झडतीत बांधकामाशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि करारनामा यांची तपासणी सुरू आहे. या छापेमारीमुळे आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा संशयाचे सावट निर्माण झाले आहे.