फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द बोलल्यास जीभ हातात काढून...नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा

    25-Aug-2025
Total Views |
 
Nitesh Rane
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाद पेटला आहे. रविवारी बीडमधील सभेत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली असून, या वादात आता भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट इशारा दिला आहे.
 
राणे म्हणाले, "खरे मराठे कधीच कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही नेहमी स्त्रियांचा मान राखला. जरांगे यांनी आरक्षणासाठी लढाई लढावी, पण फडणवीस साहेबांच्या आईविषयी बोलण्याची हिंमत केली तर आम्ही जीभ काढून टाकण्याची ताकद दाखवू."
 
जरांगे यांचा बचाव-
या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. "मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल कुठे बोललोच नाही. बोलण्याच्या ओघात काही शब्द गेले असतील तर मी ते परत घेतो. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं. पोलिसांनी आमच्या आई-बहीणींना मारहाण केली, त्यांना शिक्षा करण्याऐवजी मोठी पदं दिली. तुझी आई तुला जशी प्रिय आहे तशीच आमचीही आहे. तू आरक्षण दे, आम्ही तुझ्या आईची पूजा करू," असं जरांगे म्हणाले. आता या वादाला जरांगे काय ठाम उत्तर देतात आणि भाजप यावर कशी भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.