(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुकीचा शिगेला पोहोचलेला प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभं केलं आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं, आणि आता त्यांनी स्पष्टपणे इंडिया आघाडीच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर घणाघात केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर टीका करत, "पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणं, हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे," असा आरोप केला.
पहेलगाममध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना विचारलं का? त्यांच्या भावना जाणून घेतल्या का?" असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारची कडक शब्दांत खरडपट्टी काढली.
याचबरोबर राऊतांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, सैनिक सीमारेषेवर लढत असताना जय शाह मात्र दुबईत बसून भारत-पाक क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहेत. देशभक्तीचा गजर करणाऱ्या भाजप नेत्यांनी हा दुटप्पीपणा थांबवावा.
दरम्यान, संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, ठाकरे गट इंडिया आघाडीच्या उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देणार आहे. "उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज भरला आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी राऊतांनी असा खुलासा केला की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एनडीए उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पक्षाच्या अंतर्गत चर्चेनंतर इंडिया आघाडीचीच साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला.