मुंबईत राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट

    23-Aug-2025
Total Views |
 
Uday Samant meets Sharad Pawar
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुंबईतील राजकीय वातावरणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
 
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, ही भेट केवळ अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात होती. शरद पवार हे या संस्थेचे मुख्य विश्वस्त आहेत आणि ११ सप्टेंबरला यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. “मी त्या समितीचा सदस्य असल्याने या बैठकीसाठी शरद पवारांनी मला बोलावले. यात कोणताही राजकीय हेतू नाही,” असे सामंत यांनी सांगितले.
 
दरम्यान, प्रभाग रचनेबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले की, “प्रभाग रचनेसाठी ठराविक नियम आहेत. ते कोणत्याही पक्षाला डावलता येत नाहीत. जशी मतदारयादीत डुप्लिकेट नावे असल्याची दाद निवडणूक आयोगाकडे मागावी लागते, तशीच प्रक्रिया प्रभाग रचनेतही आहे. पराभव समोर दिसू लागल्यावर काही लोक खापर प्रभागावर फोडत आहेत.”
 
मराठा आरक्षण आंदोलनाबाबतही सामंत यांना विचारण्यात आले. त्यांनी स्पष्ट केले की, “मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारसमोर आहेत. मात्र, मराठा आणि ओबीसी समाज या दोन्ही घटकांवर अन्याय होता कामा नये, हे आमचे स्पष्ट मत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी जे काही आवश्यक असेल ते सरकारकडून नक्की केले जाईल. आंदोलन करणे की न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.”
 
याशिवाय, ईव्हीएमवरून सतत संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करत सामंत म्हणाले की, “बेस्ट पतपेढी निवडणुकीत बॅलेटवर मतदान झाले, तरी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १२ हजार मराठी मतदारांनी त्यांना नाकारले, दोन हजार मतेही त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे पराभव निश्चित दिसू लागल्यावर कारणं शोधायची आणि खापर कुठेतरी फोडायचं, अशी त्यांची पद्धत झाली आहे.