शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांची PM मोदींशी भेट; राजकीय चर्चांना उधाण

    22-Aug-2025
Total Views |
 
MP Amar Kale
 (Image Source-Internet)
 
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सतत घडामोडी सुरू आहेत. एका बाजूला पक्षांतराची मालिका सुरू असताना, दुसरीकडे नेत्यांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगत आहे. अशात शरद पवार गटाचे खासदार अमर काळे (Amar Kale) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
विकासाच्या मागण्या पुढे-
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान मोदींसोबत भेट घेऊन मतदारसंघातील विकासकामांचा विषय मांडला. त्यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, “आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वर्धा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी चर्चा केली. विशेषत: महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (MGIRI) चा सर्वांगीण विकास व त्याच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारकडून विशेष लक्ष देण्याची मागणी केली.”
 
सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चा-
काळेंच्या या भेटीबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. रोजगारनिर्मिती आणि ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी मोदींशी चर्चा केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
 
पूर्वी केलेला गंभीर खुलासा-
याआधी अमर काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला होता. त्यांनी दावा केला होता की, काही लोक त्यांच्या संपर्कात आले होते व ठराविक रक्कम देण्याच्या बदल्यात विजयाची खात्री देण्याची ऑफर देण्यात आली होती. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही अशा प्रकारचा प्रस्ताव गेला होता, असे काळेंनी सांगितले होते.