महाराष्ट्रात पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांसाठी यलो, पुणे-साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट

    22-Aug-2025
Total Views |
 
Rain warning
 (Image Source-Internet)
मुंबई:
महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता कायम राहणार असून ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
मुंबईत आज दिवसभर आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शहराचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
पुणे व साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता-
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, शहरात आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. पुण्यात कमाल तापमान 28 अंश आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील.
 
साताऱ्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने डोंगराळ भागातील प्रवाशांना प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाडा व विदर्भातील परिस्थिती-
छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडतील. येथील कमाल तापमान 29 अंश तर किमान 22 अंश नोंदवले जाईल.
 
नाशिकमध्येही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, तापमान 28 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील.
 
नागपूरमध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे, मात्र 24 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरचे कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 23 अंश असेल.
 
हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. मात्र ढगफुटीच्या घटना हळूहळू कमी होऊन उन्हाची चाहूल लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून अधिकृत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.