(Image Source-Internet)
पालघर :
पालघर जिल्ह्यातील तारापूर (Tarapur) औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मेडली फार्मासिटीकल कंपनीत नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्याने सहा कामगार बेशुद्ध पडले. त्यापैकी चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची घटना-
ही दुर्घटना काल दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कंपनीच्या प्लॉट नंबर F-13 मध्ये घडली. अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे सहा कामगार बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव या चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह-
गॅस गळती टाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा असूनही असा प्रकार कसा घडला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मानवी निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? – याचा तपास सुरू असून पोलिस आणि प्रशासन या घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
भीतीचं वातावरण-
अपघातानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर तारापूर एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या इतर उद्योगांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामगारांच्या सुरक्षेची मागणी-
या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्थानिक नागरिकांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.