रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा;अतिरिक्त सामानावर नवा दंड नाही!

    22-Aug-2025
Total Views |
 
railway passengers
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
रेल्वे (Railway) प्रवासात विमान कंपन्यांप्रमाणे अतिरिक्त सामानावर दंड आकारला जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं की, भारतीय रेल्वेने कोणताही नवा नियम लागू केलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त लगेजसाठी दंड भरावा लागणार नाही.
 
अफवा ठरल्या खोट्या-
काही दिवसांपासून सोशल मीडियात आणि माध्यमांमध्ये वृत्त पसरलं होतं की रेल्वे प्रवासात विमानासारखे नियम लागू होणार असून, स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक लगेज मशीन लावून प्रवाशांच्या बॅगांचे वजन काटेकोरपणे तपासले जाईल. मर्यादेपेक्षा जास्त सामानावर जादा भाडं आकारलं जाणार असल्याची माहितीही देण्यात आली होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी या बातम्या फेटाळून लावत प्रवाशांना दिलासा दिला आहे.

विद्यमान मर्यादा कायम-
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार प्रवाशांना ठराविक वजन मोफत नेण्याची परवानगी आहे. ही व्यवस्था अनेक दशकांपासून सुरु असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
फर्स्ट क्लास एसी प्रवाशांना 70 किलो सामान नेण्याची मुभा
एसी सेकंड क्लास प्रवाशांना 50 किलो
थर्ड एसी आणि स्लीपर क्लास प्रवाशांना 40 किलो
जनरल तिकिट प्रवाशांना 35 किलो मोफत सामान नेण्याची परवानगी
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केलं की, या मर्यादेपलीकडे कोणताही दंड आकारला जात नाही आणि विद्यमान नियम बदललेले नाहीत.
 
सणासुदीच्या काळात स्पेशल गाड्या-
दरम्यान, बिहार निवडणुका आणि दिवाळी-छठपुजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. यावर्षी तब्बल 12 हजार स्पेशल ट्रेन धाववण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 7 हजार स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या. याशिवाय, महाकुंभसारख्या मोठ्या उत्सवांच्या वेळी देखील अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.