(Image Source-Internet)
नागपूर :
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर आले होते. यावेळी नागपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी थेट अजित पवारांसमोर कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर लावला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांनी उघडपणे मांडल्या. यावर उत्तर देताना अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त सत्ता असली म्हणून काम होत नाही, आपण अधिकाऱ्यांशी कसे संबंध ठेवतो यावरही बरेच काही अवलंबून असते.”
अजित पवार म्हणाले, “मी जिथे जातो तिथे लोकांची कामं पाहण्यासाठी स्वतंत्र स्टाफ असतो. पण माझ्या स्टाफचा अनुभव असा आहे की, माझ्या सांगण्यावरूनही अनेकदा लोक पुढे येत नाहीत. म्हणूनच फक्त तक्रारी करून उपयोग होत नाही.”
सरकारच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री असल्याचा अर्थ असा नाही की सर्व कामं आपोआप पूर्ण होतात. सरकार हे संविधानाच्या चौकटीत चालते. काही कामं होतात, काही होत नाहीत. जेव्हा एखादं काम होणार नाही असं दिसतं, तेव्हा मी स्पष्ट सांगतो की ते शक्य नाही.”
आगामी निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला – “लोक फक्त कामांवरूनच मत देत नाहीत, तर आपण कोणते मुद्दे मांडतो आणि लोकांना काय आवडतं, यावरही विश्वास ठेवतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली पाहिजे. एखाद्याने माझ्या नावाचा गैरवापर केला, तर त्यावर कारवाई होईल. विशेषतः महिलांच्या कामासाठी त्यांना विश्वास वाटला पाहिजे की त्यांच्या मदतीसाठी आपण आहोत.”
अधिकाऱ्यांबाबत अजित पवार म्हणाले, “योग्य काम घेऊन जा आणि जर अधिकारी टाळाटाळ करत असतील तर मला सांगा. मग मी ठरवीन त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं. मात्र, प्रशासनाचा सन्मान कायम राखला पाहिजे कारण तेही जनतेचे सेवक आहेत.”
चुनावाच्या दृष्टीने योग्य कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देताना त्यांनी सांगितले, “काही कार्यकर्ते पुढे दिसतात पण निवडणुकीत त्यांना ५० मतेही मिळत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्ष वाढवणाऱ्यांवर भर दिला पाहिजे.”
गोंदिया-भंडारा सहकारी निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांच्या विजयाचा उल्लेख करत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काही पदाधिकारी पक्षवाढीऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा वापर करत असल्याच्या तक्रारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले आणि यावर स्वतः लक्ष ठेवण्याचा कार्यकर्त्यांना दिलासा दिला.