(Image Source-Internet)
भंडारा :
जिल्ह्यातील शिवभोजन योजना (Shiv Bhojan scheme) सध्या गंभीर आर्थिक पेचप्रसंगाला सामोरी जात आहे. गरीब व श्रमिक वर्गासाठी स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देणारी ही योजना शासनाकडून निधीअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीपासून केंद्र चालकांना एकही रुपया मिळालेला नसल्याने सात महिन्यांची थकबाकी वाढली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.
या योजनेअंतर्गत एका थाळीची किंमत पन्नास रुपये असून लाभार्थ्यांकडून फक्त दहा रुपये आकारले जातात. उर्वरित चाळीस रुपयांचा खर्च शासनाच्या अनुदानातून भागवला जातो. मात्र निधी न मिळाल्यामुळे केंद्र चालकांना वीज, गॅस, भाडे, किराणा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भागवणे कठीण झाले आहे. उधारीवर सामान मिळणेही बंद झाल्याने अनेक केंद्रे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.
गेल्या काही वर्षांत गॅस, डाळी, तेल आणि भाज्यांचे दर आकाशाला भिडले आहेत. महागाईच्या या झटक्यामुळे थाळीचा खर्च दुप्पट झाला आहे. पण शासनाकडून मिळणारे अनुदान वाढवले गेले नसल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे.
सध्या जिल्ह्यात ५४ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून दररोज जवळपास ५,८०० थाळ्यांचे वितरण केले जाते. हजारो गरीब व मजुरांसाठी हे केंद्रच पोटापाण्याचा आधार बनले आहेत. मात्र निधीअभावी ही योजना सुरू राहील की बंद पडेल, याबद्दल आता संभ्रम निर्माण झाला आहे.
केंद्र चालकांकडून शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून त्यांनी तातडीने थकबाकीची रक्कम सोडावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा सर्व केंद्रे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.