(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतचोरीसंदर्भातील आरोपांवरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून जोरदार हल्लाबोल केला. नड्डा यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ रीपोस्ट करून राहुल गांधींना लक्ष्य केले आणि त्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली.
राहुल गांधींच्या यात्रेतील व्हिडिओवरून हल्ला
नड्डा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिहारमधील राहुल गांधींच्या मतदान अधिकार यात्रेतील एक दृश्य आहे. यात एका महिलेने तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याची तक्रार केली आहे. पण त्याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तीच महिला म्हणताना दिसते की, तिला राहुल गांधींसमोर जाऊन अशी तक्रार करण्यास सांगण्यात आले होते.
“खडा हूं आज भी वहीं…” असा टोला
हा व्हिडिओ रिपोस्ट करताना नड्डा यांनी व्यंगात्मक कॅप्शन लिहिले – “खडा हूं आज भी वहीं... जहां मेरा झूठ पकडाया, सच सामने आया और मैंने अपना मजाक बनवाया... खडा हूं आज भी वहीं.” यामधून त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर थेट चिमटे काढले.
या व्हिडिओच्या मूळ पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधींचा मतचोरीचा दावा आता त्यांच्यासाठी पीआर संकटात बदलला आहे. निवडणूक आयोगाने त्यांना आपल्या सर्व आरोपांबाबत सात दिवसांत पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, यात्रेदरम्यान ज्यांनी तक्रारी मांडल्या त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना हे मुद्दे खास सांगायला लावण्यात आले होते. “राहुल गांधींची पुढील माफी लवकरच येईल,” असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.