- काही गाड्यांच्या वेळेत बदल
(Image Source-Internet)
नागपूर :
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rains) रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांवर पाणी साचले असून, त्यामुळे प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. या परिस्थितीचा विचार करून मध्य रेल्वेने नागपूरसह विदर्भातून मुंबईकडे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट-टर्मिनेट, शॉर्ट-ओरिजिनेट तसेच पुनर्निर्धारित करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे २० ऑगस्ट रोजीची १२१४० नागपूर–सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस आणि २१ ऑगस्ट रोजीची ११००२ बल्लारशाह–सीएसएमटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. पुनर्निर्धारित गाड्यांमध्ये –
१२१०५ सीएसएमटी–गोंदिया एक्सप्रेस रात्री १०:४५ वाजता,
१२२८९ सीएसएमटी–नागपूर एक्सप्रेस रात्री ११:३० वाजता,
१२१११ सीएसएमटी–अमरावती एक्सप्रेस रात्री ११:४५ वाजता सुटणार आहे.
तसेच, २२१०९ एलटीटी–बल्लारशाह एक्सप्रेस ही गाडी २० आणि २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सुटेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती करून घ्यावी.