(Image Source-Internet)
पनवेल -
महाराष्ट्रात मराठी माणूस, त्याची भाषा, जमीन आणि अस्मिता धोक्यात आली असून, बाहेरच्यांच्या घशात राज्याचे भवितव्य जात असल्याची गंभीर चिंता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी जनतेला उद्देशून त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं. "जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका."
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राबाहेर आपली प्रतिमा 'विकाऊ' माणसांची केली जात आहे. आपल्याला पैशाच्या झोल्यात अडकवलं जातंय, आणि आपण स्वतःची भाषा, जमीन, तत्वं हरवत चाललो आहोत. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणा तरी नावानं हस्तांतरित होत आहेत, पण त्याचे खरे मालक कोण, हे कोणालाही समजत नाही. हे सर्व आपल्या गाफीलपणामुळे घडतंय.”
राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील स्थितीवर विशेष भर दिला. “ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, त्यांची राजधानी! पण आज इथे डान्सबार उघडले जात आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले. तसेच, बाहेरून आलेल्या लोकांकडून जमिनी घेतल्या जात आहेत, तर मराठी युवक बेरोजगार राहत आहेत, ही विसंगती त्यांनी अधोरेखित केली.
ते पुढे म्हणाले की, “राज्यातील मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, पण इथे येणाऱ्यांना मराठी शिकवण्यावर सरकार गप्प का? महाराष्ट्रात मराठी माणसालाच परकं केलं जातंय.”
गुजरातच्या संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केलं की, “गुजरातमध्ये बाहेरच्यांना शेतजमीन घेता येत नाही. तिथे कायदा आहे. पण महाराष्ट्रात कोणालाही काहीही घेता येतं. हे धोरण थांबवायला हवं.”
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या जनसुरक्षा कायद्यावरही टीका केली. "उद्योग, प्रकल्प, जमीन यावर आवाज उठवला तर आंदोलन करणाऱ्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा डाव सुरू आहे. पण जर अशी कारवाई झाली, तर लक्षात ठेवा – मराठी माणसाच्या थडग्यावर कोणताही उद्योग उभा राहू देणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
“नवी मुंबई विमानतळात काम करणारे सर्वजण मराठी असले पाहिजेत. परप्रांतीय येऊन जमिनी विकत घेतील आणि मराठी माणूस केवळ प्रेक्षक होईल, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही,” असं सांगत राज ठाकरे यांनी मराठी जनतेला जागं राहण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी उभं राहण्याचे आवाहन केलं.
त्यांचे संपूर्ण भाषण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेवर असलेला धोका अधोरेखित करत होतं. आणि त्यातून त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला “पैसा कमवा, उन्नती करा, पण महाराष्ट्र विकून नव्हे, तर टिकवून, असे ते म्हणाले.