महादेव जानकर यांचा मोठा निर्णय; रासप आता कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, स्वबळावर लढवणार

    02-Aug-2025
Total Views |
 
Mahadev Jankar
 (Image Source-Internet)
पुणे :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) स्वतंत्र लढत करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये रासप कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे.
 
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जानकर यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्याचा संदेश दिला. "भाजपला सत्तेत आणण्यात आपण मोलाची भूमिका बजावली, पण आता त्यांना सत्तेतून खाली उतरवण्याची वेळ आली आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
 
'फक्त सोशल मीडियावर नका राहू, मैदानात उतरा'-
कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना जानकर म्हणाले, "फक्त सोशल मीडियावर फोटो टाकून काम होत नाही. प्रत्येक प्रभागात, गटात आणि गणात आपले उमेदवार उभे करायचे आहेत. पक्षाची ताकद दाखवायची असेल तर प्रत्येक बूथवर कार्यकर्ता असायलाच हवा."
 
यावेळी त्यांनी पुढील दोन महिने पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. “जो कार्यकर्ता काम करणार नाही, त्याच्याकडून जबाबदारी काढून घेतली जाईल. पक्ष सोडून गेलेल्यांच्या मागे लागू नका, नव्या लोकांना तयार करा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राजकीय स्वातंत्र्याची नवी दिशा-
भाजपसोबत दीर्घकाळ युतीत राहिल्यानंतर आता स्वतंत्र लढत करण्याचा निर्णय रासपसाठी एक टurning point ठरू शकतो. जानकर यांच्या या भूमिकेमुळे पक्षाला स्वतःचा स्वतंत्र जनाधार तयार करण्याची संधी मिळेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
 
निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी रासपसमोर मोठे आव्हान असले तरी जानकर यांच्या निर्धारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे दिसत आहे.