नागपूरमध्ये 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश; आठ पती, पन्नास लाखांची फसवणूक करून अखेर गजाआड

    02-Aug-2025
Total Views |
 
Luteri Dulhan
 (Image Source-Internet)
नागपूर :
सोशल मीडियावर प्रेमजाळं पसरवून लग्नाचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणारी आणि 'लुटेरी दुल्हन' (Luteri Dulhan) म्हणून ओळख निर्माण केलेली समीरा फातिमा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील एका दुकानात चहा पीत असताना गिट्टीखदान पोलिसांनी तिला अटक केली.
 
फेसबुकवरून सापळ्याची सुरुवात –
मार्च २०२३ मध्ये पहिली तक्रार दाखल झाली होती. ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्या गुलाम गौस पठान यांच्याशी तिची फेसबुकवर ओळख झाली. स्वतःला घटस्फोटित असल्याचं सांगत तिनं त्यांची सहानुभूती मिळवली आणि काही दिवसांतच विवाह केला. त्यानंतर घरगुती कलह, खोटे आरोप आणि धमक्यांच्या आधारे पैशांची मागणी सुरू झाली. बलात्काराचा खोटा गुन्हाही दाखल करण्याचा प्रयत्न तिने केला होता.
 
'शिक्षिका'च्या नावाखाली फसवणुकीचा डाव –
समीरा फातिमा स्वतःला शिक्षिका म्हणून सादर करत होती. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होती आणि विवाहित पुरुषांशी जवळीक साधून त्यांना "मी एकटी आहे", "मला तुझी गरज आहे" अशा भावनिक खेळात अडकवत होती. लग्नाच्या काही आठवड्यांतच ती मुद्दाम वाद निर्माण करून खोट्या पोलिस तक्रारींचा धाक दाखवत पैसे वसूल करत असे.
 
एकावर एक लग्नं, लाखोंची गंडा –
सध्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, तिने किमान आठ पुरुषांशी लग्न करून अंदाजे ५० लाखांची फसवणूक केली आहे. ठिकाणं सतत बदलत राहणे, पोलिसांपासून लपणे, आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरफायदा घेणं, हा तिचा नेहमीचा डाव होता.
 
शिक्षक व्यवसायाला लागलेला डाग –
शिक्षक असल्याचा दावा करणाऱ्या समीरामुळे या प्रतिष्ठित व्यवसायाची प्रतिमा मलीन झाली आहे. शिक्षकांकडून समाजाला दिशा मिळते, पण तिच्या अशा वागण्यामुळे लोकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.
 
कोठडी आणि तपास सुरू –
तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, गिट्टीखदान पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अन्य पीडितांनी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. आणखी किती फसवणूक प्रकरणं उघडकीस येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.